निरा-भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक काळजी घ्यावी -प्रांताधिकारी सचिन इथापे
उजनी धरणातून 80 हजार तर वीर धरणातून 63 हजार 323 क्युसेक्स विसर्ग
पंढरपूर (दि,31 ) : उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने दुपारी 4.00 वाजता उजनी धरणातून 80 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 63 हजार 323 विसर्ग असा एकूण 1 लाख 43 हजार 323 क्युसेक्स इतका विसर्ग सुरु आहे. वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग हा निरा नरसिंहपुर (संगम) येथे भीमा नदीत मिसळत असल्याने नीरा व भीमा नदीकाठी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने निरा-भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

उजनी व निरा संगमाचा विसर्ग भीमा नदीपात्रात एकत्रित पोहोचणार असल्याने धोक्याची पाणी पातळी वाढ होण्याची शक्यता आहे. तलाठी व मंडलाधिकारी यांनी भीमा नदीकाठच्या सखल गावांना व वाड्यावस्त्यांना तसेच पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी काठच्या नागरिकांना तात्काळ सतर्कतेचा इशारा द्यावा. नदीपात्रातील जनावरे, इलेक्ट्रीक पंप हलवावे गाव पातळीवर दौंडीद्वारे जाहीर सूचना द्याव्यात . पोलीस प्रशासनाने घाटावर व नदीपात्रात प्रवेश बंदीची अंमलबजावणी सुरू करावी. वाळवंट परिसरातील वारकरी भाविक यांना नदीपात्रातून दूर हलवावे. गस्त वाढवून आवश्यक तेथे बॅरिकेटिंग करावे . पाटबंधारे विभागाने दर तासाला पाणी पातळी व धरणातील विसर्ग बाबत अद्यावत माहिती नियंत्रण कक्षास कळवावी. आरोग्य विभागाने नदीकाठच्या उपकेंद्रावर आपत्कालीन वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी तसेच मुबलक औषध साठा उपलब्ध ठेवावा. वीज वितरण विभागाने नदीकाठचे विद्युत वाहिन्या रोहित्र तपासून आवश्यकतेनुसार वीज पुरवठा खंडित करण्याबाबत आवश्यकती कार्यवाही करावी .
नगरपालिका प्रशासनाने सकल भागातील पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र व ड्रेनेज पंप तपासावेत व तात्पुरती निवारा केंद्र सज्ज ठेवावेत. आपत्कालीन परिस्थितीत बोट व जीव रक्षक साहित्य करावे. नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावा. पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरपरस्थितीत नदीपात्रावरील घाट व प्रवेश बंद ठेवावा. सुरक्षेच्या दृष्टीने पुलावरील व नदीकाठावरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळवावी. भीमा नदी पात्रात पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये सर्व विभागांनी पूरनियंत्रणासाठी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी अशा सूचना ही प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी दिल्य पाण्याखाली जाण्यास सुरवातीचा विसर्ग क्युसेक्स
चंद्रभागा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग 26 हजार क्यूसेक्स असल्यास सोलापूर- पंढरपूर रस्त्यावरील जुना दगडी पूल पाण्याखाली जातो. पाण्याचा विसर्ग 35 हजार क्यूसेक्स असल्यास पंढरपूर नगरपालिका बंधारा पाण्याखाली जातो. पाण्याचा विसर्ग 40 हजार क्युसेक्स असल्यास भीमा नदीपात्रावरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जातात. पाण्याचा विसर्ग एक लाख 07 हजार क्यूसेक्स असल्यास पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावरील जुना गोपाळपूर पूल पाण्याखाली जातो. पाण्याचा विसर्ग 96 हजार ते एक लाख 15 हजार क्युसेक्स असल्यास व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरते. तर विसर्ग एक लाख 60 हजार असल्यास पंढरपूर -मंगळवेढा रस्त्यावरील नवीन गोपाळपूर पूल पाण्याखाली जातो. तसेच पाण्याचा विसर्ग एक लाख ३० हजार क्यू सेक्स असल्यास संतपेठ झोपडपट्टीत पाणी शिरते. अशा वेळेस पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी. झोपडपट्टीत पाणी शिरण्याच्या अगोदरच नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे.